विलेपार्लेत उजळली ‘अक्षर ज्योत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विलेपार्लेत नुकताच ‘अक्षर ज्योत’ हा कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अक्षर ज्योत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी व रसिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.

अक्षर ज्योत या कार्यक्रमात ज्योत्स्ना देवधर यांच्या साहित्यकृतींचे प्रभावी अभिवाचन करण्यात आले. पुष्कर श्रोत्री, मधुरा वेलणकर आणि दीप्ती भागवत यांनी आपल्या अभिवाचनातून त्यांच्या साहित्याचा भावस्पर्शी अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवला. गायक नचिकेत देसाई, अर्चना गोरे यांनी सादर केलेल्या निवडक गीतांनी कार्यक्रमाला सुरेल रंगत आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक, संहिता विकास परांजपे व दुहिता सोमण व सादरीकरण ‘स्वरवंती क्रिएशन्स’ यांनी केले. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, आमदार पराग अळवणी व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.