बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला ही चांगली गोष्ट नाही. त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला शिक्षा होणे आवश्यक होते. या अत्याचार प्रकरणात आणखी कोण कोण अडकले आहेत, हे त्याच्या चौकशीतून बाहेर आले असते. मात्र सखोल चौकशी करण्याऐवजी पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. त्याचा एन्काऊंटर हा हे प्रकरण दडपण्यासाठीच घडवून आणला आहे, असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या आईने आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याचे ठाणे गुन्हे शाखेने एन्काऊंटर केल्यानंतर संपूर्ण राज्यातून जोरदार टीका झाली. आता या एन्काऊंटरप्रकरणी पीडित मुलीच्या आईनेही गंभीर आरोप केले आहेत.
माझ्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर आम्हाला कोणीच न्याय दिला नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न शाळेच्या ट्रस्टींनी केला. त्यांची प्रतिष्ठा, शाळेचे नाव त्यांना महत्त्वाचे वाटले. या प्रकरणात अक्षयबरोबर अन्य आरोपींचाही समावेश असू शकतो. पोलिसांनी जर कसून तपास केला असता तर हे सर्व उघडकीस आले असते. मात्र अक्षयचा एन्काऊंटर झाल्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला खीळ बसली आहे. अन्य आरोपींना वाचवण्यासाठीच पोलिसांनी हे एन्काऊंटर घडवून आणले आहे.
पोलिसांनी काहीच सांगितले नाही
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घरी येऊन चौकशी केली. मात्र तपासात काय निष्पन्न झाले आहे, याची कोणतीही कल्पना पोलिसांनी आम्हाला दिली नाही. अन्य आरोपींना अटक केली आणि आता त्यांची जामिनावर सुटका झाली याबाबतही पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे तपासाबाबत संशय निर्माण झाला आहे, अशी खंत पीडित मुलीच्या पालकांनी व्यक्त केली आहे.