
उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी या वर्षी 22 एप्रिल रोजी उघडले जाणार आहेत. हिवाळ्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हे मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या जयघोषाने दुमदुमणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या अधिकाऱयांनी रविवारी दिली. महाशिवरात्रीला यात्रेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे जनसंपर्क अधिकारी हरीश गौर यांनी सांगितले की, भगवान केदारनाथांचे हिवाळी वास्तव्य असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात हा निर्णय घेण्यात आला. हिंदू पंचांगानुसार गणना करून मंदिर उघडण्याची वेळ निश्चित केली. 12 ज्योतार्ंलगांकैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे कपाट 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता उघडले जातील. दरम्यान, या सोहळ्यासाठी ओंकारेश्वर मंदिर साडेनऊ क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. केदारनाथ मंदिराच्या मुख्य पुजाऱयासह शेकडो भाविक उपस्थित होते. ‘जय बाबा केदार’चा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
चारधाम यात्रेचे वेळापत्रक याप्रमाणे
गंगोत्री आणि यमुनोत्री धाम – अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिल रोजी या दोन्ही मंदिरांचे दरवाजे उघडतील.
केदारनाथ धाम – 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता भाविकांसाठी प्रवेश सुरू होईल.
बद्रीनाथ धाम – 23 एप्रिल रोजी बद्रीविशालचे दर्शन सुरू होईल.























































