आळंदीत कार्तिकी यात्रेस 6 ते 14 डिसेंबर या काळात आळंदीत संचारबंदी

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेच्या धर्तीवर आळंदीतील कार्तिकी यात्रा नियोजन करण्यात आल्याने आळंदीत 6 ते 14 डिसेंबर या काळात कोरोना पार्श्वभूमीवर आळंदी पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी आळंदी पंचक्रोशीतील 12 गावांत असणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

यावर्षीची यात्रा आळंदीत भाविकांविना होणार असून संचार बंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापने बंद राहणार असल्याने व्यापारी नागरिकांमध्ये मात्र नाराजी आहे. संचारबंदीचे काळात भाविक, नागरिक, वारकरी यांनी सहकारी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या वर्षीचे यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी यावर्षी आळंदी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याचा भाविकांचे उपस्थितीत करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यासाठी काही वारकऱ्यांची उपस्थिती तसेच त्यासाठी प्रशासनाने अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. बंधनात तसेच संचारबंदीचे सावटात आळंदी कार्तिकी यात्रा होणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक देखील आळंदी मंदिरात झाली.

आळंदी कार्तिकी यात्रेस परंपरेने येणाऱ्या दिंड्यांतील पंढरपूर येथून तीन दिंड्यांतील प्रत्येकी वीस वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आळंदीसह पंचक्रोशीतील 12 गावात संचारबंदी आदेश असल्याने धर्मशाळेत वारकर्‍यांना आणि भाविक भक्तांना राहण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. इंद्रायणी नदीचे परिसरात संचारबंदी व कालावधीत भाविकांना स्नान करण्यास बंदी घातली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या बाहेर इतर ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी असून माऊली  मंदिरात पास शिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. मंदिरातील  धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मान्यवर भाविकांच्या उपस्थितीत होणार आहेत. कार्तिकी यात्रा कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन कोणालाही करता येणार नाही. मंदिरात प्रवेश करताना मास्कचा वापर, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे बंधन राहणार आहे.

कार्तिकी काळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी वतीने परंपरेचे  कार्यक्रम सोशल मीडिया, युट्युब, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यास आदेशित करण्यात आले आहे. भाविकांना ऑनलाईन दर्शन मिळेल यासाठी उपाययोजना करण्याचे संस्थानला पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांचे सुधारित आदेशाने बजाविण्यात आले आहे. या वर्षीची कार्तिकी यात्रा भाविक, वारकरी यांचे शिवाय होणार असल्याने व्यापारी नागरिकांत नाराजी आहे. स्थानिक व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याची गरज असल्याचे व्यापारी नागरिकांतून सांगितले जाते.

ज्ञानेश्वर महाराजांच्या 724 वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून आळंदी संस्थानला सशर्त परवानगी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांनी राज्य शासनाचे नियंत्रणात दिली आहे. यासाठीचे आदेश त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. यात पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयास कार्तिकी यात्रा काळात आळंदी व पंचक्रोशीतील 12 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश पारित करण्यास आदेश दिले आहेत.

यामध्ये आळंदी, चऱ्होली खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळु, मरकळ, चऱ्होली बुद्रुक, डूडूळगाव या गावांमध्ये 6 ते 15 डिसेंबर 2020 या दरम्यान संचार बंदी लागू होत आहे. यावेळी हॉटेल व धर्मशाळा, भक्त निवासात भाविक, वारकरी यांना मुक्कामास मनाई ठेवली आहे. माऊली मंदिरात कीर्तन व भजन, जागर करण्यास 15 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांचा मुक्काम संस्थांनचे नियोजनाप्रमाणे राहणार आहे. राज्यातून विविध भागातून परंपरागत सेवेकऱ्यांची सेवा माऊलीं मंदिरात होणार आहेत.

अशा सेवेकऱ्यांच्या सेवेसाठी 5 व्यक्तींना निमंत्रित करण्यास कलविणेत आहे आहे . सेवा झाल्यानंतर परत गावी जावे लागणार आहे. श्री पांडुरंगराय, श्री संत नामदेवराय व भक्त पुंडलिक या दिंडी पालख्यांना आळंदीत शासनाचे आदेशाने प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्याच्या प्रवेश हद्दीवर परवानगी नसलेल्या येणाऱ्या दिंड्याना व वाहनांना आळंदीकडे सोडले जाणार नाही. परत पाठविले जाणार आहे. प्रवासी वाहतूक वाहने बंद ठेवली जाणार आहे. इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी असणार आहे. मंदिरातील समाधी सोहळ्याच्या मंदिरात येणाऱ्या मानकरी, सेवेकरी, वारकरी यांची रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या