इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास

53

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर अॅलिस्टर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. हिंदुस्थानविरुद्ध होणारा पाचवा कसोटी सामना आपल्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असेल असे त्याने जाहीर केले आहे. कुकने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडा विश्वातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

अलिस्टर कुक याने टीम इंडियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये सुमार कामगिरी केली. याच कारणाने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला असावा असे क्रिकेटणधील जाणकार बोलत आहेत. टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत कुकचा फॉर्म खराब राहिला असला तरी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर जमा आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यासाची घोषणा करताना कुक म्हणाला की, ‘मी गेल्या काही महिन्यांपासून यावर खूप विचार केला आणि अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्याच घेण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानविरुद्ध ओव्हलमध्ये होणारा कसोटी सामना माझ्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असणार आहे. हा माझ्यासाठी दु:खद दिवस आहे परंतु मी हे आनंदी चेहऱ्याने तुम्हाला सांगत आहे. कारण मला माहीत आहे मी माझे सर्व काही संघासाठी दिले आणि आता माझ्याकडे देण्यासारखे काही राहिले नाही. मी आतापर्यंत जे मिळवले आहे याबाबत कधी विचारही केला नव्हता. इंग्लंड संघातील अनेक दिग्गजांसोबत दीर्घ काळ खेळल्याने मला अभिमान वाटत आहे.’

कुकच्या कारकीर्दीचा अजब संयोग
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुक याने 2006 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच सामन्यात त्याने शतकही ठोकले होते. कुकच्या कारकीर्दीचा अजब संयोग म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात त्याने हिंदुस्थानविरुद्ध खेळताना केली होती आणि शेवटचा सामना देखील तो हिंदुस्थानविरुद्धच खेळणार आहे.

सर्वाधिक धावांच्याबाबतीत सहाव्या स्थानावर
अॅलिस्टर कुक सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. कुकच्या पुढे सचिन तेंडुलकर (15,921 धावा), रिकी पॉन्टिंग (13,378 धावा), जॅक कालिस (13,289 धावा), राहुल द्रविड़ (13,288 धावा) और कुमार संगकारा (12,400 धावा) हे खेळाडू आहेत. कुकने आतापर्यंत 160 कसोटी सामन्यांमध्ये 12,254 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 32 शतकांचा समावेश आहे. दरम्यान, अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरी करून संगकाराचा विक्रम तोडण्याची संधी त्याच्याकडे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या