
सामना ऑनलाईन । मुंबई
अनंत चतुर्दशीमुळे उद्या रविवारी ड्राय डे असला तरी समस्त तळीरामांनी ही बातमी वाचलीच पाहिजे. मित्रांसोबत बसल्यानंतर मी कधी तरीच घेतो…पार्टी असेल तर लाइट पेग घेतो…आपण कंट्रोलमध्येच असतो अशा मोठमोठ्या बाता मारणारे पेगवर पेग मारून कधी अनकंट्रोल होतात तेच कळत नाही. त्यामुळेच हिंदुस्थानातील तळीरामांचा स्टॅमिना गेल्या दहा वर्षांत दुप्पट झाला असून तो अडीच लिटरवरून चक्क साडेपाच लिटरवर गेला आहे. त्याचा संबंधितांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
देशातील तळीरामांचा स्टॅमिना 2025 पर्यंत सुमारे दोन लिटरने वाढेल असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने बांधला होता, मात्र समस्त तळीरामांनी त्यांचा अंदाज धुळीला मिळवत मोठी मजल मारली आहे. 2005 मध्ये प्रति माणसी अल्कोहोल रिचवण्याचे प्रमाण 2.4 लिटर एवढे होते. त्यामध्ये गेल्या दहा वर्षांत दुपटीहून अधिक वाढ होऊन 5.7 लिटरवर गेले आहे. यामध्ये पुरुष 4.2 लिटर तर स्त्रिया दीड लिटर अल्कोहोल घेत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हिंदुस्थानातील तळीरामांचा स्टॅमिना दुपटीने वाढलेला असला तरी जागतिक स्तरावर अल्कोहोल रिचवण्याचे प्रमाण गेल्या सहा वर्षांपासून 6.4 लिटर एवढे स्थिर आहे.
- अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे 200 हून अधिक आजारांना आमंत्रण.
- जगभरात अल्कोहोलमुळे यकृत निकामी होण्याबरोबरच इतर अवयव निकामी होऊन जायबंदी झालेल्यांची संख्या 132 दशलक्ष एवढी आहे.
- जगभरात 2.3 अब्ज तळीरामांची संख्या आहे. त्यामध्ये 15-19 वयोगटातील तरुणांचे प्रमाण 26 टक्के एवढे आहे.
- विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशात मोठी संख्या.
अल्कोहोलमुळे वर्षाला 30 लाख तळीरामांचा मृत्यू
जगभरात तळीरामांची सख्या झपाट्याने वाढत असून अल्कोहोल रिचवण्याची त्यांची क्षमताही वाढली आहे. त्यामुळेच दरवर्षी अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे 30 लाख तळीरामांना प्राण गमवावे लागत आहे. हा आकडा एचआयव्ही, टीबी आणि मधुमेह या जीवघेण्या आजारांमुळे बळी जाणाऱ्यांच्या संख्येपेक्षा मोठा आहे. बळी जाणाऱ्यांचे हे प्रमाण एकूण मृत्यूच्या 5.3 टक्के एवढे आहे. तसेच यकृत निकामी होण्याबरोबरच अन्य अवयव निकामी होण्याचे प्रमाणही मोठे आहे.





























































