अलिबाग नगर परिषदेच्या सीसीटीव्ही सर्व्हेलेन्स यंत्रणा उभारणीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी गांभीर्याने घेतले आहे. सीसीटीव्ही सर्व्हेलेन्स यंत्रणेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जावळे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती येत्या बुधवारी याप्रकरणी सुनावणी घेणार आहे.
अलिबाग शहरात कायदा सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हेलेन्स यंत्रणा उभारण्यासाठीच्या 3 कोटी 10 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. या निधीतून शहरात 32 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ठेकेदाराने जे दर लावले आहे ते अतिशय महाग असून एका ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी सरासरी सुमारे दहा लाख रुपये खर्च होणार आहे. तो बाजारभावाच्या वीसपट असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती. संजय सावंत यांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीत विद्युत वितरण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती लेखाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत. याप्रकरणी बुधवारी सुनावणी होणार असून यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.