
सामना ऑनलाईन। अलिबाग
यंदाचा मिस टिन इंडिया युनिव्हर्सचा किताब पटकावणारी रायगडची अपूर्वा ठाकूर शनिवारी रात्री अलिबागेत आली. यावेळी अलिबागकरांनी तिचे जंगी स्वागत केलं. फटाक्याच्या आतषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात अपूर्वाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. तिचे अभिनंदन करण्यासाठी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर तसेच शहरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
नोएडा येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. यात देशभरातून 16 ते 19 वयोगटातील शेकडो स्पर्धकांच्या विविध परीक्षा घेतल्यानंतर त्यामधून 10 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. या दहा जणांमध्ये अनेक स्पर्धात्मक फे-या पार पडल्यानंतर परिक्षकांनी अपूर्वा प्रवीण ठाकूर हिला मिस टिन इंडिया युनीव्हर्स जाहीर करून विजेतेपदाचा मुकूट बहाल करण्यात आला. तसेच पनामा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेसाठी हिंदुस्थानतर्फे तिची निवड झाली आहे.
अलिबागकरांनी केलेल्या स्वागताने आपण भारावलो आहोत. देशाबरोबरच अलिबागकरांची मान जगभरात उंचावण्याची कामगिरी करू असा विश्वास अपूर्वाने यावेळी व्यक्त केला. तर अलिबागचे नाव देशपातळीवर नेणाऱ्या आपल्या लेकीचा अभिमान वाटत असल्याची भावना तिचे वडील ठाकूर यांनी व्यक्त केली. तिचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथे झाले त्यानंतर गोल्ड इंटरनॅशनल नवी मुंबई,युनिव्हर्सिटी आर्टस ऑफ लंडन येथे झाले असून पुढील शिक्षणासाठी तिने अमेरीकेतील थॉमस जेफरसर युनिव्हर्सिटी मध्ये आर्कीटेक्ट पदवीसाठी प्रवेश घेतला आहे.
आज अलिबागकरांनी मला जे प्रेम दिलं, ज्या पदधतीने माझं स्वागत केलं त्याने मी खरंच भारावून गेले आहे. हा माझयासाठी गौरवाचा क्षण आहे. माझ्या डोळयात आनंदाश्रू आहेत. मार्चमध्ये होणाऱ्या आांतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी माझी तयारी मी करणार आहे आणि त्यातून आपल्या सर्वांसाठी आणखी गौरवास्पद कामगिरी करून दाखवेन. ही स्पर्धा खूपच कठीण होती. जशी माझ्यासाठी होती तशी माझ्या सोबतच्या इतर स्पर्धकांसाठीही होती. कारण जेव्हा तुम्ही देशाची जबाबदारी एखाद्याच्या खांद्यावर देता तेव्हा तेवढयाच ताकदीनं विचार करावा लागतो.
माझ्या मुलीने ही अविस्मरणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे अलिबागचे, रायगड जिल्हयाचे नाव उंचावले आहे. याचा मला निश्चितच अभिमान आहे. ती आज शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडची कन्या झाली आहे. आपल्या देशाचं नाव सातासमुद्रापार नेईल अशी आपण अपेक्षा करूया असे अपूर्वाचे वडील अॅड. प्रवीण ठाकूर यांनी म्हटले आहे.

































































