अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळील बंधाऱ्याची दूरवस्था

365

अलिबाग समुद्रकिनारी समुद्राचे पाणी बाहेर पडू नये आणि किनारा सुंदर दिसावा, यासाठी गॅबियन पद्धतीचा बंधारा पतन विभागामार्फत 2014 साली बांधण्यात आला. लाटांच्या अजस्त्र तडाख्याने हा बंधारा सहा वर्षात ढासळण्यास सुरुवात झाली असून त्याला मोठी भगदाडे पडली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची डागडूजी केली नाही तर समुद्राचे पाणी बंधारा फोडून किनारपट्टी भागात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा बंधारा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पतन विभागामार्फत गॅबियन पध्दतीचा बंधारा बांधण्यात आला. 2011 साली बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली होती. 2014 मध्ये बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. 650 मीटर लांबीच्या या बंधाऱ्यासाठी 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. सिमेंट ब्लॉक्स रचून आणि लोखंडी जाळीच्या साह्याने बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यावर नंतर पर्यटकांना चालण्यासाठी सिमेंट ट्रॅक बांधण्यात आले होते. दररोज हजारो पर्यटक या बंधाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी येत असतात. अलिबागच्या समुद्रकिनारी बांधलेल्या या बंधाऱ्याने समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडली होती. मात्र, समुद्राच्या लाटाचे तडाखे आणि खारे पाणी यामुळे बंधाऱ्याची लोखंडी जाळी तुटण्यास सुरवात झाली आहे. बंधाऱ्यासाठी रचलेले ब्लॉक्स हळूहळू ढासळण्यास सुरवात झाली. यामुळे बंधाऱ्यावर उभारण्यात आलेला सिमेंटचा पदपथही नष्ट होत आहे. त्यामुळे बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात संपुर्ण बंधारा नष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच उधाणाच्या दिवसात, लाटांच्या तडाख्यामुळे किनारपट्टीवरील भाग जलमय होण्याची भीती आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

लाटांच्या तडाख्यामुळे बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. नगर पालिकेकडूनही बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरु आहे. मात्र, हे काम पतन विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यांनी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, असे अलिबाचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. तर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, विभागाकडे सध्या त्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या कामाच्या अर्थसंकल्पयीय तरतुदीसाठी आम्ही प्रस्ताव पाठवत आहोत. निधी उपलब्ध झाला तर पावसाळ्यापूर्वी काम सुरु होऊ शकेल, असे पतन विभागाचे सहायक अभियंता निलेश चोरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या