
मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात दरड कोसळून विठा गायकर या वृद्धेचा मृत्यू झाला. अख्खा गाव शोकाकुल असताना मिंध्यांचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नीने मात्र हाणामारी केली. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर हात उगारला आणि धक्काबुक्की केली. या घटनेमुळे गावकरी अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी मानसी दळवी यांना इथून चालते व्हा.. आम्ही आणि प्रशासन बघून घेऊ, असे सांगत त्यांना गावाच्या बाहेरचा रस्ता दाखवला.
तुफानी पावसामुळे मिठेखार गावावर सकाळीच दरड कोसळली. या दुर्घटनेत विठा गायकर (७५) यांचा जागीच मृत्यू झाला. अवघा गाव शोकाकुल झाला. नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांना ही बाब कळताच त्यांनी गावात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
त्यापाठोपाठ मिंधेंचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवीही तेथे दाखल झाल्या. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सत्ता तुमच्याकडे आहे, प्रशासन तुमच्याकडे आहे मग अशा दुर्घटना घडतात कशा, त्यावेळी तुमची तत्परता कुठे जाते, असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला. त्यामुळे मानसी दळवी यांचा संताप उफाळून आला. त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर हात उगारला आणि त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे शेकापचे कार्यकर्तेही संतापले.
गावात मृत्यू झालाय… राजकारण कसले करता
या घटनेमुळे ग्रामस्थांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी येथे गावात मृत्यूचा प्रसंग आहे आणि राजकारण कसले करता. तुम्ही इथून निघून जा, असे मानसी दळवी यांना सुनावत गावाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान चित्रलेखा पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुरुड संघटक राजश्री मिसाळ यांना गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी आपण लागेल ती मदत करू आणि ग्रामस्थांच्या सर्व मागण्या सरकारकडून विना अटी-शर्ती मान्य करून घेऊ, असे आश्वासन दिले.