
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे स्वच्छता निधीचे दोन रुपये वसूल करते. मात्र गेल्या महिनाभरापासून अलिबागच्या एसटी आगारात कचऱ्याची अक्षरशः बजबजपुरी झाली आहे. या कचरापट्टीमुळे प्रवासी तसेच शेजारीच रेस्टीरूम असलेल्या चालक आणि वाहकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रवाशांकडून वसूल केला जाणारा दोन रुपयांचा स्वच्छता निधी जातोय कुठे, असा संतप्त सवाल अलिबागकरांनी केला आहे.
अलिबाग, मांडवा, मुरुड, बोर्ली मांडला ही पर्यटनस्थळे असलेले मुंबई, ठाणे, पुण्यातून आलेले असंख्य पर्यटक रोज अलिबाग आगारात पायउतार होतात. स्थानिक भागात प्रवास करणारे प्रवासीही याच आगारातून एसटीच्या गाड्या पकडतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या एसटी आगाराचे अक्षरशः डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. या कचऱ्याचे ढीग जागोजागी पडल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगतच एसटीचालक आणि वाहकांचे विश्रामगृह आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे डास, माशा आणि किटकांची मोठ्या प्रमाणावर पैदास झाली असून विश्रामगृहात आराम करणाऱ्या चालक-वाहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
चालक-वाहकांची काळजी घ्या!
एसटी महामंडळ प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे स्वच्छता निधी म्हणून दोन रुपये वसूल करते. हा निधी अलिबाग आगाराला मिळत नाही काय, असा संतप्त सवाल थेरोंडा येथील रहिवासी सत्यजित पितळे यांनी विचारला. अलिबाग आगारातील हा कचरा त्वरित हटवून परिसर निर्जंतुक करण्यात यावा आणि चालक-वाहकांच्या विश्रामगृहाची स्वच्छता राखण्यात यावी, अशी मागणीही पितळे यांनी केली.
“अलिबाग एस. टी. आगारात ठिकठिकाणी कचरा जमा असल्याचे चित्र दिसून येते. आगार परिसराची नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे. नियमित स्वच्छता न केल्याने अनेकदा आगार परिसरात दुर्गंधी पसरत आहे.”
राजेश म्हात्रे, प्रवासी



























































