
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सातही तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सातही तलावांत आता 14,39,588 दशलक्ष म्हणजेच 99.46 टक्के जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी वर्षभर पुरेल. यामुळे या वर्षी पाणीकपातीचे संकटही दूर होणार आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. 1 ऑक्टोबरच्या रोजीच्या साठ्यानुसार वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पावसाळा, वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. मात्र या वर्षी सर्व तलाव ओसंडून वाहू लागल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
- अप्पर वैतरणा – 2,26,083
- मोडक सागर – 1,28,925
- तानसा – 1,44,976
- मध्य वैतरणा – 1,91,517
- भातसा – 7,12,373
- विहार – 27,698
- तुळशी – 8,046
तीन वर्षांतील 28 सप्टेंबरची स्थिती
- 2025 – 14,39,588
- 2024 – 14,39,272
- 2023 – 14,33,141
सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
- अप्पर वैतरणा – 2,26,083
- मोडक सागर – 1,28,925
- तानसा – 1,44,976
- मध्य वैतरणा – 1,91,517
- भातसा – 7,12,373
- विहार – 27,698
- तुळशी – 8,046
तीन वर्षांतील 28 सप्टेंबरची स्थिती
- 2025 – 14,39,588
- 2024 – 14,39,272
- 2023 – 14,33,141
पालिकेच्या सर्व यंत्रणा अॅक्शन मोडवर
बृहन्मुंबई क्षेत्रात मागील दोन दिवस सातत्याने पाऊस कोसळत आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सर्व यंत्रणा अॅक्शन मोडवर आहेत. पावसाच्या पाण्याचा वेळेत निचरा करण्यासाठी पालिकेची विविध पथके सेवेत आहेत. पर्जन्य जलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगार-कर्मचाऱ्यांसह पालिकेचे अधिकारी, अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य, कर्मचारी, आपत्कालीन पथके, सर्व कर्मचारी, कामगार प्रत्यक्षस्थळी कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वेळीच उपाययोजना करण्याचे विविध निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत.