
सामना ऑनलाईन । अलाहाबाद
धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचे असलेले अलाहाबाद शहर आता प्रयागराज म्हणून ओळखले जाणार आहे. उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ सरकारने अनेक शहरांची नावे बदलण्याची मोहीम सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याची मागणी साधूसंतांकडून करण्यात येत होती. पुराणात प्रयागराजचा उल्लेख आढळतो. पौराणिक, सामजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या या शहराला त्याची ओळख परत मिळावी यासाठी शहराचे नाव बदलण्याची घोषणा योगी सरकारने नुकतीच केली होती. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहराचे नाव प्रयागराज करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सरकारच्या या निर्णयावर साधु-संत आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. बैठकीनंतर राज्य सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी शहराचे नाव बदलण्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले.
पुराणात ब्रह्मदेवाचे यज्ञस्थळ म्हणून प्रयागराजचा उल्लेख आहे. मुगल सम्राट अकबरच्या काळात १५७५ मध्ये प्रयागराजचे नाव बदलून अलाहाबास करण्यात आले. अलाहाबास म्हणजे अल्लाचे शहर या अर्थाने अकबराने हे शहर वसवले. त्यानंतर त्यांनी येथे किल्ला बांधला आणि या शहराचे महत्व वाढले. त्यानंतर इंग्रजांनी १८५८ मध्ये या शहराचे नाव अलाहाबाद असे केले आणि आगारा- अवध यांची संयुक्त राजधानी म्हणून अलाहाबादची निवड केली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अलाहाबाद महत्वाचे केंद्र होते.
अकबराने प्रयागराजचे नाव बदलून अलाहाबाद हे नाव शहरावर थोपवले आहे. ते बदलून प्रयागराज करावे आणि त्याची प्राचीन ओळख परत मिळावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. इंग्रजांच्या काळात मदन मोहन मलावीय यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतरही वेळोवेळी ही मागणी करण्यात येत होती. उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार आल्यावर पुन्हा ही मागणी जोर धरू लागली. योगी सरकारने लवकरच शहराचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. मगंळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.


























































