जय बाबा बर्फानी! 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आता काही व्यवहार सुरू होण्याची तयारी सुरू झाली आहे. आता 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून फक्त 10 हजार भक्तांनाच ही यात्रा करण्याची परवानगी असणार आहे. बालटाल मार्गावरूनच ही यात्रा जाईल. त्याशिवाय हेलिकॉप्टरनेही ही यात्रा करण्याचा विचार सुरू आहे. यात्रा सुरू करण्यापूर्वी यात्रेकरूंची कोरोना चाचणी करणं अनिवार्य असेल.

तसंच, जर एखादा यात्रेकरू कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. एका दिवशी 500 यात्रेकरूंनाच दर्शनाची परवानगी मिळणार आहे. 55 वर्षं वयाहून कमी यात्रेकरूंनाच परवानगी देण्याचाही विचार सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. ही यात्रा दोन आठवड्यांची असून 3 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जम्मू येथील अमरनाथ यात्रेचा तळ असलेलं यात्री निवास भवन हे क्वारंटाईन सेंटरमध्ये परिवर्तित करण्यात येत असल्याचंही वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या