
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे नोकऱ्यांमध्ये उलथापालथ झाली आहे. यामुळे कंपन्यांतील कामाच्या पद्धतीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अशातच ई कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. ॲमेझॉनने पहाटे कर्मचाऱ्यांना दोन टेक्स्ट मेसेज करून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
बिझनेस इन्सायडरच्या एका अहवालानुसार, ॲमेझॉनने एका मिनिटाच्या अंतराने कर्मचाऱ्यांना दोन मेसेज पाठवले. या मेसेजमध्ये त्यांना ऑफिसमध्ये गेल्यावर वैयक्तिक ईमेल तपासण्याची सूचना दिली. तर दुसऱ्या मेसेजमध्ये ईमेल मिळाला नसल्यास कंपनीच्या हेल्प डेस्क क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत सांगितले. टेक्स्ट करून कर्मचाऱ्यांची कपात करण्याची ही नवीन पद्धत सुरू झाली आहे.
ॲमेझॉनने प्रामुख्याने रिटेल मॅनेजमेंट टीम्समध्ये कपात केली आहे. कंपनीने सांगितलं की त्यांना त्यांच्या ऑपरेशन्समध्ये सुधारणा करायच्या आहेत. याबाबत ॲमेझॉनचे एचआर हेड बेथ गॅलेट्टी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, या सर्व कर्मचाऱ्यांना 90 दिवसापर्यंतचा पूर्ण पगार व कंपनीचे अन्य सर्व लाभ मिळतील. तसेच या कर्मचाऱ्यांना नवी नोकरी मिळवून देण्यासाठी ॲमेझॉनकडून प्लेसमेंट असिस्टन्स मिळेल. दरम्यान, गॅलेट्टी यांनी एक ब्लॉग पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अमेझॉनच्या कार्यपद्धतीत बदल होत असल्याचे म्हटले आहे.



























































