गेल्या नऊ दिवसांपासून सर्वत्र मंगलमय आणि उत्साही वातावरणात सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता, आज विजयादशमीस दसऱ्याच्या सोहळ्याने झाली. म्हैसूर पाठोपाठ देशात प्रसिद्ध असलेला आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या करवीर नगरीचा शाही सीमोल्लंघनाचा सोहळाही सायंकाळी संपन्न झाला. दरम्यान विजयादशमी निमित्त आज साडेतीन शक्तीपीठांपकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची रथारुढ पुजा साकारण्यात आली तर खंडे नवमी निमित्त सर्वत्र परंपरेनुसार शस्त्रे, वाहनांचे पूजन करण्यात आले.
यंदा दि. 3 ऑक्टोबर रोजी परंपरेनुसार सकाळी तोफेच्या सलामीनंतर करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरासह सर्वच मंदिरे तसेच घराघरात घटस्थापना होऊन, शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाली.तर आज विजयादशमी दसरा दिवशी सकाळी तोफेची सलामी झाल्यानंतर विधीवत बसविलेले हे घट काढण्यात आले. मंदिरात देवी देवतांना शमीची पाने वाहून गाभाऱ्यात दसऱ्याचे विधी करण्यात आले. खंडे नवमी निमित्त मंदिरातील आयुधांचे पूजन करुन, नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.
दरम्यान सायंकाळी ऐतिहासिक दसरा चौक येथील सिमोल्लंघनाच्या सोहळ्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास करवीर निवासिनी श्रीअंबाबाई, श्रीतुळजाभवानी देवी तसेच गुरु महाराजांची पालखी भालदार-चोपदार अशा पारंपरिक लावाजम्यासह दाखल झाली.त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास न्यु पॅलेस येथून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती हे पारंपारिक मेबॅक वाहनातून पारंपरिक आणि पोलिसांच्या लवाजम्यासह दसरा चौक मैदानात दाखल झाले.भालदारांनी ललकारी देत त्यांना सलामी दिली. पोलीस बँडच्या तालावर करवीरसंस्थानचे गीत झाले. सरदार, मानकऱ्यांचे मुजरे घेत,खासदार शाहू महाराजां सह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले.
यावेळी उपस्थित शाही शामियाणातील विविध सरदार, राजघराण्याचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधींची भेट होऊन,सुर्यास्ताच्या मुहूर्तावर वैदिक स्कूलच्या पुरोहितांकडून मंत्रोपचार व देवतांची आरती झाल्यानंतर सजवलेल्या लकडबंदमधील शमींच्या पानांचे पुजन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती तसेच शाही परिवाराच्या हस्ते झाले. यावेळी बंदुकीतून हवेत फैरी झडताच, मैदानाच्या चौफेर थांबलेल्या कोल्हापूरकरांनी शमीची पाने लुटण्यासाठी एकच गर्दी केली. यानंतर जनतेकडून आपट्याची पाने स्वीकारत हा शाही लवाजमा भवानी मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाला. तर करवीर निवासिनी श्रीअंबाबाई ची पालखी सिद्धार्थनगर मार्गे पंचगंगा नदी घाट आणि मंदिराकडे रात्री उशिरा रवाना झाली.
या सोहळ्यावेळी भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर देवीच्या पालख्यांसोबत राजेशाही मिरवणूकी तून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूला एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली.यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर,विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जि.प.चे सीईओ कार्तिकेयन एस.यांच्यासह सरदार, इनामदार घराण्यातील प्रमुख मानकरी,सरकारी अधिकारी उपस्थित होते.