“मतदार तिसरा डोळा उघडतील आणि कलंक पुसतील”, अंबादास दानवेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ही टीका फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर फडणवीसांनी एक ट्विट केले. या ट्विटला विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांनी ट्विट केलेल्या आठ मुद्द्यांना अंबादास दानवे यांनीही आठ मुद्द्यांमध्ये उत्तर दिले आहे.

‘कलंक नसताना तो दिसणे त्याला नजरेतील दोष म्हणतात, दिसून न दिसल्यासारखं करणे त्याला ढोंगीपणा म्हणतात. उपचार आता भाजपवर होतील आणि ते जनताच करणार आहे. त्रिशूळ असल्याचे सोंग तुम्ही आणता, मात्र तिसरा डोळा मतदारांकडेच आहे. ते योग्यवेळी तो उघडतील आणि कलंक पुसतील.’ अशा शब्दात अंबादास दानवे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटले की,
कावळ्यांची काविळ!

1. ज्यांच्या विरुद्ध लढून तुमच्या पक्षाचा पाया मजबूत केला अश्या गोपीनाथ मुंडे यांच्या लढ्याला तिलांजली देऊन त्यांचे राजकीय वैरी फोडाफोडीने जवळ करणे, याला म्हणतात कलंक!

2. ‘मन की बात’ उर्दूतून प्रसिद्ध करणे, मशिद भ्रमण करणे आणि पुन्हा स्वतःला हिंदुत्वाचा पाईक म्हणणे, याला म्हणतात कलंक!

3. समुद्रात झेप घेऊन मर्सिलिस बंदर गाठणाऱ्या वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार न देणे, याला म्हणतात कलंक!

4. राम मंदिर आंदोलनात कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या व्यक्तीला ‘पद्मविभूषण’ देणे, याला म्हणतात कलंक!

5. आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करणे, वारकऱ्यांवर लाठ्या चालवणे, याला म्हणतात कलंक!

6. महाराष्ट्रातून दरदिवशी 70 महिला बेपत्ता होतात आणि त्यांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश येत नाही, हा आहे कलंक!

7. कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार न करता त्यांचे शव गंगेत वाहू देणे, पीएम केअर फंडाचा हिशेब जनतेपुढे न ठेवणे, याला म्हणतात कलंक!

8. कोरोना महामारी शिखर गाठत असताना पश्चिम बंगालसारख्या दाट लोकसंख्येच्या राज्यात हट्टीपणाने निवडणुकांच्या प्रचारसभा घेणे, परिस्थिती अनुकूल नाही म्हणून महाराष्ट्रात निवडणूका न घेणे, याला लोकशाहीवर कलंक म्हणतात!

कलंक नसताना तो दिसणे त्याला नजरेतील दोष म्हणतात, दिसून न दिसल्यासारखं करणे त्याला ढोंगीपणा म्हणतात. उपचार आता भाजपवर होतील आणि ते जनताच करणार आहे. त्रिशूळ असल्याचे सोंग तुम्ही आणता, मात्र तिसरा डोळा मतदारांकडेच आहे. ते योग्यवेळी तो उघडतील आणि कलंक पुसतील.

(सोबत देवेंद्रजी यांचा हल्लीचा फोटो)