महाराष्ट्रातील जनता या निवडणुकीत भाजपवर किंक्रांत काढणारचं; अंबादास दानवे यांचा ठाम विश्वास

गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली. तेव्हापासून महायुती सरकारच्या कुरघोड्या सुरू झाल्या. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपवर किंक्रांत काढणार हे निश्चित असल्याचा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. त्यामुळे या निवडणुकांसाठी आता मराठी माणसाने जागे होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 15 जानेवारीला निवडणुका होणार आहे. म्हणजेच संक्रांतीच्या दुसरा दिवस हा करीचा, किंक्रांतीचा असतो. आणि याच दिवशी भाजपवर महाराष्ट्रातील जनता किंक्रांत काढणार आहे, असे ते म्हणाले. तसेच आता निवडणुका घोषित होताच चोरांनीच उलट्या बोंबा सुरू केल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच 25 वर्षे मुंबई लुटली म्हणणारे मुंबई लुटताना तुम्ही कुठे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबईविषयी, महाराष्ट्राविषयी भाजपच्या चोरांनी उलट्या बोंबा मारायला सुरू केल्या आहेत. भाजपच्या संघटन मंत्र्यांना विदर्भातील बैठकीत सांगावं लागलं होतं की, निवडणुकीत पैसा, संपतीचं प्रदर्शन करू नका. तेच लोकं आता उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना ही आता मोठ्या प्रमाणावर लाखो करोडो रुपये टाकणार, असा आरोप करत आहेत. 25 वर्षे यांनी मुंबई लुटली असं म्हणणारे ही मुंबई लुटताना तुम्ही कुठे होतात? शिवसेनेचा महापौर असताना भाजपचा उपमहापौरही होता. स्थायी समितीसह वेगवेगळ्या समितीत भाजपचे लोक होते. हा मुद्दा देखील या निवडणुकीत महत्तवाचा असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

एकीकडे महायुती म्हणायचं आणि दुसरीकडे अजित दादांच्या पक्षाला बैठकीत बोलवायचं नाही. त्यांचा पक्ष हा मुंबईत नवाब मलिक चालवतात. पिंपरी चिंचवडसारख्या शहरात भाजप स्वतंत्र लढणार. पण अजितदादाला सोबत घेणार नाही. म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप अजित पवार गटाविरोधात लढणार असल्याची घोषणा झाली असल्याचे ते म्हणाले.

निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच महायुतीची तंतरली

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीत तडे गेले आहेत. ही कसली महायुती? एकदा सांगायचं ट्रिपलं इंजिन मग डबल इंजिन तर कधी सिंगल इंजिन बोलायचं. नेमकं यांना किती इंजिन आहेत? म्हणून ही महायुती निवडणुकीला सामोरेजाण्यापूर्वी यांची सगळ्या ठिकाणी तंतरलेली आहे, असं आजच्या महाराष्ट्राचं चित्र आहे. निवडणुकांची घोषणा होऊन फक्त 12- 15 तासांतच स्वत:ला महायुती मानणाऱ्याची ही स्थिती झालीए, असा हल्लाबोल यावेळी दानवे यांनी केला.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. युती होणार याबाबत पूर्णपणे निर्णय झालेला आहेच. दोन-चार दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेची युती घोषित होऊ शकते, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे म्हणाले.