बांग्लादेशमधील हिंदूवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तातडीने चर्चा करा, अंबादास दानवे यांचे केंद्राला आवाहन

सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या महिनाभरापासून बांग्लादेशात हिंसाचार सुरू होता. या हिंसाचारात आतापर्यंत 100 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी बांग्लादेशमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी सकाळी राजीनामा दिला त्यामुळे आता देश लष्कराच्या हातात गेला आहे. सैन्य लवकरच तिथे अंतरिम सरकार स्थापन करणार आहे.

दरम्यान बांग्लादेशमधील परिस्थितीवरून शिवसेना नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे. सध्या बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने बोलणी करावी असे आवाहन दानवे यांनी केले आहे. ”बांग्लादेशमधील आंदोलन हे तेथील अल्पसंख्यांकांच्या मुळावर उठू पाहते आहे. हिंदू आवमी लीगचे नेते हरधन रॉय यांच्यासह रंगपूर शहरातील 2 हिंदूंची हत्या या दरम्यान झाल्याचे बातम्यांमध्ये आले आहे. हिंदुस्थानच्या केंद्र सरकारला महाराष्ट्राचे हे आवाहन आहे की बांगलादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्यास तातडीने बोलणी करावी, आवश्यक पाऊले टाकावीत. जगातील हिंदूंसाठी हिंदुस्थानातून आवाज नाही उठवणार तर मग कुठून उठवणार? असा सवाल त्यांनी एक्सवरून केला आहे.