पाकिस्तानच्या बॉण्डपेपरवर जमिनीचा व्यवहार, मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार; अंबादास दानवे यांनी केली महसूल विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल

महायुती सरकारच्या काळात राज्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केली. महसूल विभागातील गैरकारभाराचा पर्दाफाश करताना त्यांनी चक्क पाकिस्तानच्या बाँडपेपरवर ठाणे जिह्यातील मीरा-भाईंदरमध्ये झालेला जमिनीचा व्यवहार सभागृहासमोर आणला.

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना दानवे यांनी राज्य सरकारच्या बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पुराव्यासह मांडली. ते म्हणाले, फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तीची मालमत्ता येथे आपल्या देशात आहे. ही मालमत्ता एनिमी प्रॉपर्टी म्हटले जाते. एनिमी प्रॉपर्टी असताना महसूल विभागाने पाकिस्तानी बाँडपेपरच्या आधारावर महसूल विभागाने कारवाई केली आहे, असे सांगत त्यांनी आपल्या हातातला पाकिस्तानी बाँडपेपर दाखवला. पाकिस्तानच्या बाँडपेपरवर आपल्या येथे कारवाई झाली. हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला.

संपत्तीच्या फेरफाराचा हा प्रकार 

हे प्रकरण मीरा-भाईंदरचे असून हा प्रकार राजू शहा यांनी बाहेर काढला. याप्रकरणी त्यांनी तक्रार केली होती. हे प्रकरण बाहेर काढले म्हणून त्यांना आता पाकिस्तानमधून धमकीचे फोन येत आहेत. तू तक्रार केली तर तुला गुह्यात अडकवू, अशी धमकी दिली गेली. हा प्रकार संपत्तीच्या फेरफाराचा प्रकार आहे. हा बाँड पाकिस्तानातून आला आणि महसूल विभागाने त्याआधारे कारवाई केली हे चुकीचे आहे.

कराचीतून धमकी आली  

महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी पाकिस्तानी बाँडपेपरवर अशी कारवाई कशी करू शकतात, तक्रार करू नये यासाठी तक्रारदाराला कराचीतून धमकी येते. हे प्रकरण अतिशय भयानक असून सभागृहाने, सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी दानवे यांनी केली.