विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही मिंधे सरकारने शासनाच्या संकेतस्थळावर एका दिवसात 259 निर्णय प्रसिद्ध केले. तसेच 27 महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. हा आचारसंहितेचा भंग असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाली असतानाही मिंधे सरकारने अनेकa वित्तीय आणि धोरणात्मक निर्णय घेतले. यामुळे सत्ताधारी पक्षाला निवडणूक प्रक्रियेत अप्रत्यक्ष फायदा मिळणार आहे. 16 ऑक्टोबरलाही 30-40 निर्णय घेतले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर 27 महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांमध्ये काही लोकांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या नियुक्त्या या राजकीय बंडखोरी रोखण्याच्या दृष्टीने करण्यात आल्यामुळे आचारसंहितेच्या नियमांनुसार त्या नियुक्त्या बेकायदेशीर आहेत, असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.