सभागृहात संधी दिली तर सोमय्या विरोधात पुरावे सादर करू – अंबादास दानवे

भाजप नेता किरीट सोमय्या याची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाली असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अणुबॉम्बच फुटला आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी काही महिलांवर अत्याचार केले असून त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे याबाबत तक्रार केली असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार व विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

”भाजप संस्कृतीच्या मोठ्या गप्पा मारत असते आणि त्यांच्याच नेत्यांच्या अशा क्लिप समोर आल्या आहेत. या प्रकरणी काही महिला दोन महिन्यांपासून आमच्या संपर्कात आहेत. या सगळ्या महिला येणाऱ्या काळात किरीट सोमय्याचे वेगवेगळे विषय समोर आणतील. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशी करावी. तसंच जर मला संधी दिली तर मी या प्रकरणातील योग्य ते पुरावे सभागृहात सादर करू”, असे दानवे यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

अंबादास दानवे यांनी याबाबत एक ट्विट देखील केले आहे. त्यात त्यांनी ”किरीट सोमय्या, नागडा तर तु झालेलाच आहे. राहीलं साहिलं आज करतो, पेन ड्राईव्ह घेऊन येतोये.भेटुया, सभागृहात!” असा इशारा दिला आहे.