अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागमी जोर धरू लागली आहे. या दरम्यान अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘या व्यवहारात मोठे आकडे सांगितले गेलेत, पण एक रुपयाचा देखील व्यवहार झालेला नाही”, असे म्हटले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी अजित पवारांचे हे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’ आहे, असा टोला लगावला आहे.

”अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’ आहेत. इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही ‘बेसंबंध’ वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल.. डबल इंजिनकी सरकार, भ्रष्टाचार करेंगे धुवांधार”, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीचा भूखंड घोटाळा समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याचीच मागणी लावून धरली आहे. त्यामुळे जमिनीचा व्यवहार रद्द केल्याशिवाय सरकारकडे गत्यंतर नव्हते असे सांगितले जाते.

‘अशी’ हडपली बोपोडीतील 500 कोटींची सरकारी जमीन

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसह नऊ जणांनी बोपोडी येथील कृषी खात्याच्या मालकीची 5.35 हेक्टर जमीन कूळ वहिवाटीची असल्याचे दाखवून हडपल्याचे प्रकरण आज समोर आले. या जमिनीची सरकारी किंमत 500 कोटी रुपये असली तरी प्रत्यक्षात बाजार मूल्यानुसार हे जमीन 1000 कोटी रुपयांची आहे. याप्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे एक टक्का भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही जमीन सन 1883 पासून कृषी खात्याच्या म्हणजेच शासनाच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. या जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी ‘अ‍ॅग्रिकल्चर डिपार्टमेंट’ यांचे नाव असल्याबाबत महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पारित झालेले आहेत. जुन्या पुणे मुंबई रस्त्यालगत ही जमीन आहे. पुणे शहर क्षेत्रामध्ये कुळ कायदा लागून नसताना देखील ही जमीन कुळाची दाखवून हडप करण्याचा प्रकार झाला. याप्रकरणी सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचे भागीदार आणि मामेभाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शितल तेजवानी, कुलमुखत्यारधारक हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे या सर्व 9 जणांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 पर्यंत हा प्रकार घडला आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या संगनमताने या जमिनीचा अपहार झाला.