अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ जणांना अखेरचा निरोप, अंत्यसंस्कार करणाऱया पथकालाही शोक अनावर

एकाच सरणावर आठ मृतदेह… सरण रचणाऱयाच्या डोळय़ात दाटून आलेला महापूर… सरण रचून झाले.. मुखाग्नी द्यायचा..टेंभा धरलेला हात थरथरू लागला… देवा काय ही वेळ आणलीय… चार खांद्यावर वाजत गाजत जायचे… मागच्या गर्दीने हळहळायचे.. तिथे शेवटचा चेहराही बघताना कंठ दाटून येत नाही… तर भीतीने चेहरा गारठून जातो… सगळेच उसासे मागे पडलेत. अंबाजोगाईच्या स्मशानभूमीतील हे काळीज गोठवून टाकणारे दृष्य पाहून कोरोनाही ओशाळला…

बीड जिल्हय़ात कोरोनाने मंगळवारी 10 जणांचा बळी घेतला. यापैकी सात हे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील असून एक सावरगाव लोखंडी येथील कोविड केंद्रातील आहे. हे आठही मृतदेह रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आणण्यात आले. रुग्णाच्या दोन नातलगांना पीपीई कीट देण्यात आले. नगरपालिकेच्या पथकाने सरण रचले. एकाच सरणावर आठ मृतदेह ठेवण्यात आले.

मृतदेहांमध्ये सोशल डिस्टन्सिंग

मृतांचे नातलग अस्थींची मागणी करतात. मृतदेहाच्या अस्थी एकमेकांत मिसळू नयेत म्हणून मृतदेहांमध्ये दीड ते दोन फुटांचे अंतर ठेवण्यात आले. मृतांच्या दोन नातलगांना पीपीई कीट घालून सरणाजवळ बोलावण्यात आले. अगदी क्षणभर चेहरा दाखवण्यात आला अन् लगेच झाकून टाकण्यात आला. लगोलग टेंभा पेटवून मुखाग्नी देण्यात आला. अंत्यसंस्कार करणाऱया पथकालाही हे काळीज चिरणारे दृष्य पाहून गलबलून आले.

आपली प्रतिक्रिया द्या