घरगुती सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणाऱ्या तस्करांचा अड्डा बदलापूर ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून नामांकित कंपन्यांचे ५०० हून अधिक सिलिंडर व गॅस रिफिलिंग साहित्य असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तस्करांकडे कोणतीही परवानगी नसून सुरक्षितता नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अंबरनाथ व बदलापूर हा इंडस्ट्रियल झोन असून तेथे मोठ्या प्रमाणात केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बदलापूर येथील राहतोली गावाजवळील एका फार्महाऊमध्ये सिलिंडर तस्करीचा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या फार्महाऊसवर छापा मारला असता त्याठिकाणी त्यांना एचपी, भारत व गो गॅससारख्या नामांकित कंपन्यांचे 5 किलो, 21 किलो, 19 किलोचे सिलिंडर आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गॅस चोरट्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जादा पैसे कमावण्यासाठी हे चोरटे घरगुती सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीररीत्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत हा गोरख धंदा उद्ध्वस्त केला. अशाच प्रकारे अंबरनाथमधील बोहोनोली गावाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये असाच गोरख धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई केली.
काळाबाजार कोणाच्या आशीर्वादाने
काळ्या बाजारात घरगुती गॅस सिलिंडर 1 हजार ते 1 हजार 200 रुपयांपर्यंत तर व्यावसायिक सिलिंडर 1 हजार 800 ते 2 हजार 400 रुपयांपर्यंत विकला जातो. त्यामुळे हे तस्कर घरगुती सिलिंडरमधील गॅस चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या तस्करांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर कोण पुरवतो, या मागे मास्टर माईंड कोण आणि कोणाच्या आशीर्वादाने हा गोरख धंदा सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.