
अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे पाच हजार कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण केल्याचे अदानी समूहाने गुरुवारी जाहीर केले. शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली. अंबुजा सिमेंटने सांघी सिमेंट कंपनीचे 56.74 टक्के शेअर्स खरेदी केले. सांघी कंपनीचे सध्याचे समूह प्रवर्तक रवी सांघी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून अदानी समूहाने ही डील केली.
अंबुजा सिमेंटने केलेल्या या अधिग्रहणामुळे कंपनीने आपल्या गतिशील प्रगतीच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी सांगितले. सांघी कंपनीचे अधिग्रहण केल्यामुळे अंबुजा सिमेंट कंपनीचा बांधकाम साहित्य क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. या अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता तब्बल 76.6 दशलक्ष टन इतकी होणार आहे. अदानी समूहाने 2028 पर्यंत तब्बल 140 दशलक्ष टन सिमेंट उत्पादन क्षमता वाढविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांत सांघीपुरम येथील सिमेंट उत्पादन क्षमता 15 दशलक्ष टन म्हणजेच एमटीपीएपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तसेच देशात सर्वात कमी किमतीत मिळणाऱया पक्क्या विटांचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून सांघीची ओळख निर्माण करण्याचे ध्येय असल्याचे अदानी कंपनीने म्हटले आहे. सांघी सिमेंट कंपनीचा गुजरातमधील कच्छ जिह्यातल्या सांघीपुरम येथे सांघी कंपनीचा सिमेंट आणि क्लिंकर म्हणजेच पक्क्या विटा निर्मितीचा मोठा उत्पादन प्रकल्प आहे. तब्बल 2,700 हेक्टर जागेत हा प्रकल्प विस्तारला असून या ठिकाणची क्लिंकर उत्पादन क्षमता तब्बल 6.6 दशलक्ष टन इतकी आहे.
कंपनीचा निव्वळ नफा 8,759 कोटींवर
अदानी पावर लिमिटेडने गुरुवार, 30 जून 2023 पर्यंत संपलेल्या तिमाहीत 8,759 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाल्याचे म्हटले आहे.


























































