अमेरिकेने चीनच्या नांगीवर ठेवला पाय, ब्रिटननेही धमकी दिल्याने ड्रॅगनचा तिळपापड

14042

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा धनी होत आहे. अनेक बड्या देशांनी चीनच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत याच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये यामुळे तणावाचे वातावरण आहे. अशातच साम्राज्यवादी चीनने हाँग काँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्यानंतर जगभरातील देश सावध झाले असून चीनविरोधात एकजूट झाले आहेत.

गुरुवारी युके, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने संयुक्त निवेदन जारी करत चीनची निंदा केली. हाँग काँगमधील नवीन सुरक्षा कायदा ब्रिटन आणि चीनमध्ये 1984 ला झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. यामुळे हाँग काँगच्या नागरिकांच्या स्वातंत्र्यवर गदा येण्याची शक्यता आहे. 1997 पर्यंत ब्रिटनच्या अमलाखाली असणारा हाँग काँग ‘वन कंट्री, टू सिस्टम’ अंतर्गत चीनला सोपविण्यात आला होता. मात्र हाँग काँगला राजकीय आणि कायदेशीर स्वायत्तता देण्यात आली होती. अशात चीनने नवीन सुरक्षा कायद्याचा घाट घातल्याने हाँग काँगचे कायदा आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. याविरोधात हाँग काँगचे नागरिक रस्त्यावर उतरले असून चीन सैन्य बळाचा वापर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेसह ब्रिटनने याला विरोध केला आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनिक राब याबाबत बोलताना म्हणाले की, चीनने नवीन सुरक्षा कायदा बनवण्याचा घाट घालू नये. चीनने नवीन कायदा लागू केल्यास ब्रिटन ‘ब्रिटिश नॅशनल ओवरसीज पासपोर्ट होल्डर्स (BNO) चा दर्जामध्ये बदल करेल. यानंतर हाँग काँगमध्ये राहणारे ब्रिटिश पासपोर्ट होल्डर 6 महिन्याहुन अधिक काळ ब्रिटनमध्ये राहू शकतील आणि त्यांच्या नागरिकतेवरही विचार केला जाईल. मात्र अमेरिका आणि ब्रिटनच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत चीनने हा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले.

हाँग काँगचे नागरिक रस्त्यावर
चीनविरोधात हाँग काँगमध्ये तीव्र संताप उफाळला असून लोक रस्त्यावर उतरले आहेत. चीनने ‘वन कंट्री, टू सिस्टम’ नुसारच आपले काम करावे असे लोकांचे म्हणणे असून हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी चीनने सैन्यबळाचा वापर सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या