
चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा विळखा संपूर्ण जगाला पडला आहे. जागतिक महासत्ता असा रुतबा मिरवणारी अमेरिका देखील यातून सुटलेली नाही. कोरोनाचा प्रकोप अमेरिकेत दिवसेंदिवस वाढत असून 1000 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जवळपास 70 हजार लोकांना या रोगाची लागण झाली. संक्रमित रुग्णांच्या बाबतीत इटली, चीननंतर अमेरिकेचा नंबर लागला आहे. यानंतर स्पेनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
अमेरिकेत वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे 1031 लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या माहितीनुसार, सर्वात जास्त मृत्यू न्यूयॉर्क शहरात झाले आहेत. येथे जवळपास 366 लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर वाशिंग्टन या शहरात मृतांचा आकडा 133 आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला आहे. चिम, इटली, स्पेन नंतर कोरोनाच्या कवेत अमेरिका जात आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेतील परिस्थिती इटली सारखी होण्याची शक्यता असल्याचे विधान डब्ल्यूएचओचे प्रवक्ता मार्गरेट हॅरिस यांनी केले आहे.
अमेरिकेत कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यापासून साडे चार लाख कोरोना संक्रमित लोकांची तपासणी करण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात तपासणी सुरू आहे. अमेरिकेतील काही भागात थंडी वाढत असल्याने कोरोनाचा फटका बसल्याची शक्यता आणखी बळावली आहे, असे ‘नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इंफेक्शियस डिजीस’ निर्देशक डॉक्टर एंथोनी फॉसी यांनी म्हंटले आहे.
अमेरिकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वाशिंग्टन, आयोवा, लुइसियाना, नॉर्थ कैरोलिना, टेक्सास आणि फ्लोरिडा येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. यातील न्यूयॉर्क शहर कोरोनाचा केंद्रस्थानी असून जवळपास 30 हजार रुग्ण येथे आहेत.
दरम्यान हिंदुस्थानात कोरोना रुग्णांचा आणि मृतांचाही आकडा वाढत आहे. आतापर्यत 659 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, यातील 124 रुग्ण महाराष्ट्रमधील आहेत. महाराष्ट्र पाठोपाठ केरळ मधील आकडा 100 पार गेला आहे. देशात कोरोनामुळे 15 मृत्यू झाले असून यातील 4 जण महाराष्ट्रमधील आहेत.