म्हणून अमेरिकेत वाढतोय कोरोनाचा वेग, 24 तासात आढळले नवे 52 हजार रुग्ण

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या वेगावर नियंत्रण मिळवणे आता अशक्य होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत 52 हजार कोरोना विषाणूग्रस्तांची नोंद झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळल्याचा हा अमेरिकेतील नवा उच्चांक आहे. अमेरिकेत सर्व व्यवहार पूर्व पदावर आणण्याची प्रक्रिया सुरू असताना हे घडत असल्याने संकट अधिक गडद होत चालले आहे.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत कोरेना विषाणूचे 26 लाखाहूनही जास्त रुग्ण आढळले आहेत. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर या विषाणूमुळे आतापर्यंत 1.28 लाख लोकांचा बळी गेला आहे.

अमेरिकेतील बर्‍याच तज्ञांचे म्हणणे आहे की बेफिकीर वृत्ती, बिनधास्तपणामुळे ही प्रकरणे वाढत आहेत. कारण लोकांचा संयम आता सुटत चालला असून अनेक जण नियम पालन करण्यात टाळाटाळ करत आहेत.

दरम्यान, जगात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वेगाने वाढ झाली आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे यातील सर्वाधिक संख्या ही अमेरिका, ब्राझील आणि हिंदुस्थान सारख्या देशांमधून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगात मंगळवारी एकूण 1.89 लाख प्रकरणे नोंदवली गेली, जी एका दिवसात सर्वाधिक नोंद आहे. अमेरिकेत, जेथे दररोज 40 हजाराहून अधिक प्रकरणे येत आहेत, तर ब्राझीलमधून दररोज 30 हून अधिक प्रकरणे येत आहेत. त्याचबरोबर हिंदुस्थानात गेल्या काही दिवसांपासून 20 हजारच्या आसपास प्रकरणे येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या