अमेरिकेचा श्वास कोंडला!

539

>> प्राची देशमुख

अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराला निमित्त ठरली ती 8 मिनिटे 46 सेकंदांची एक निंदनीय घटना. मिनेसोटा राज्यातील मिनीयापोलीस शहरात कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडचा पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या मृत्युमुळे सध्याचा वांशिक वणवा पेटला आहे. या वणव्यात अमेरिकेचा श्वास कोंडला आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या जीवितहानीचे संकट अद्याप संपुष्टात आलेले नाही. त्यातच अमेरिकेतील बहुतांशी शहरात वांशिक हिंसाचाराने सध्या थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटात लॉक डाऊनचा पर्याय अमेरिकेने अगोदर अवलंबिला नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत गेले. आता 27 मेपासून वाढत असलेल्या हिंसाचाराने अमेरिकेतील अनेक शहरे संचारबंदीत आहेत. गरज पडल्यास सैन्याला पाचारण करावे लागेल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंगेखोरांना बजावले आहे. अमेरिकेतील निम्मी राज्ये सध्या या हिंसाचाराच्या विळख्यात आहेत. टेक्सास, जॉर्जिया, ओहियो, मिनेसोटा इत्यादी राज्यांच्या राज्यपालांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या तुकडय़ा परिस्थितीवर नियंत्रणासाठी नियुक्त केल्या आहेत. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन शहरात मोठय़ा प्रमाणात आंदोलनकर्ते आक्रमक झाले. हिंसक जमावामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना काही काळ सुरक्षेच्या कारणास्तव बंकरमध्ये हलवावे लागले. यावरून तेथील परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. अटलांटा, सिएटल, लॉस एंजलिस, कोलंबस, शिकागोसह अनेक शहरांत मोठय़ा प्रमाणात जाळपोळ, लुटालूट, हिंसाचाराचे विदारक चित्र आहे. 3 जूनपर्यंत 11 पेक्षा अधिक अमेरिकन नागरिकांचा हिंसाचारात मृत्यू झाला आहे. त्यात बहुतांशी आफ्रिकी वर्णाच्या अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. शेकडो लोक जखमी झाले असून पाच हजारच्या वर आंदोलनकर्ते, दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेत गेले आठ दिवस सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराला निमित्त ठरली ती 8 मिनिटे 46 सेकंदांची एक निंदनीय घटना. मिनेसोटा राज्यातील मिनीयापोलीस शहरात 25 मे रोजी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडचा पोलिसांच्या ताब्यात असताना झालेला दुःखद मृत्यूमुळे सध्याचा वांशिक वणवा पेटला आहे. जॉर्जने बनावट 20 डॉलरचे चलन वापरून सिगारेट खरेदी केल्याची तक्रार दुकानदाराने केली होती. पोलीस घटनास्थळी आल्यावर जॉर्जला ताब्यात घेण्यात आले. डेरेक चौवेन व इतर तीन पोलिसांच्या उपस्थितीत जॉर्जला जी मारहाण व धक्काबुक्की झाली त्याचे प्रत्यक्षदर्शींनी काढलेले व्हीडिओ समाजमाध्यमात प्रसिद्ध झाले आहेत. पोलीस अधिकारी डेरेकने जमिनीवर पडलेल्या जॉर्जची मान बराच वेळ आपल्या टोंगळ्याने दाबून धरली. हे सगळ घडत असतांना जॉर्ज मला श्वास घेता येत नाहीए म्हणून पोलिसांना आर्जव करत होता. त्याच्या विनवणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. उपस्थित इतर तीन पोलीस अधिकारी जमिनीवर पालथ्या पडलेल्या जॉर्जला धरून होते. तब्बल 8.46 मिनिटे हा प्रकार सुरू असतांना जॉर्जचा श्वासोच्छ्वास थांबला. अर्थात जॉर्जच्या अखेरच्या श्वासानंतरसुद्धा डेरेकने मानेवरील आपला टोंगळा काढला नाही. पुढे जॉर्जला इस्पितळात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले.

जॉर्जच्या दुर्दैवी हत्येनंतर पोलीस अधिकारी डेरेकवर हत्येचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. जॉर्जच्या समर्थनार्थ व पोलीस प्रशासन, सरकारच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात निदर्शने सुरू झाली. अल्पावधीतच आंदोलन करणारा जमाव हिंसक होऊ लागला. अमेरिकेतील अनेक शहरात या हिंसेचे लोण पसरले. शासकीय, खासगी मालमत्तेची प्रचंड नासधूस, बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात जमावाकडून लुटालूट सुरू झाली. त्यात याही प्रकरणाला वेगळा रंग दिला गेला. जॉर्जच्या मृत्यूला वर्णभेदाचा रंग चढवण्यात सरकार व विरोधी पक्षांनी चिथावणी दिली असे आरोप अमेरिकेत उघडपणे केले जात आहेत. या दुःखद घटनेच्या आणि त्यानंतर उफाळलेल्या हिंसाचाराच्या वणव्यात राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न होत आहेत. असेही बोलले जात आहेत. येणाऱया वर्षात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षित असतांना या घटना घडत आहेत. काहींच्या मते कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारी ओढवल्याने झालेली लुटालूट व हिंसाचारामागे एक मुख्य कारण असण्याचासुध्दा शक्यता आहे. मृतक जॉर्ज हा स्वतः एका हॉटेलात बाऊन्सर म्हणून कार्यरत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला नोकरी गमवावी लागल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रकाशित केले आहे. अमेरिकेतील पोलिसांच्या प्रशिक्षणाबाबत सुध्दा बरेच मतभेद आहेत. अमेरिकन पोलिसांना दिले जात असलेले प्रशिक्षण हे प्रामुख्याने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱया अट्टल गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी दिले जाते. पोलिसांचे प्रशिक्षण जॉर्जच्या मृत्यूला कारणीभूत ठरले असावे अशी चर्चा आहे. परंतु ‘एनबीसी न्यूज’ने दिलेल्या बातमीनुसार मिनीयापोलीस शहरात मानेला दाबून गुन्हेगाराला वठणीवर आणण्याची पद्धत प्रचलित असावी. 2015 पासून अशा प्रकारे 44 व्यक्तींना पोलिसांनी बेशुध्द केल्याची नोंद असल्याकडे ‘एनबीसी न्यूज’ने लक्ष वेधले आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.

अर्थात जॉर्जचा मृत्यू दुर्दैवी असला तरी सार्वजनिक ठिकाणी लुटालूट करणे आणि कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेल्या सामान्य जनतेला हिंसाचाराच्या माध्यमातून वेठीस धरणे याचेदेखील समर्थन करता येणार नाही. शांततेने केलेले आंदोलन नक्कीच समर्थनीय ठरेल. आफ्रिकी-अमेरिकन समुदायावर अमेरिकेत दुर्दैवाने वर्णभेदातून अत्याचार झाले आहेत. त्या कारणामुळे त्यांचा व्यवस्थेविरोधातला रोष हा संधी मिळेल तेव्हा उफाळून येत असतो. आताही कदाचित जॉर्ज फ्लॉइड याचा पोलिसी खाक्यामुळे झालेला मृत्यू हा रोष उफाळून येण्यास कारणीभूत ठरला असावा. त्यात त्याला राजकीय पाठबळही मिळाले असावे. त्यातून उद्रेक वाढला असेल. घडलेला प्रसंग वर्णभेदातून झाला असेल तर समाजाच्या सर्वच स्तरातून संयुक्तपणे त्यावर मार्ग काढता येऊ शकेल. त्यासाठी हिंसाचार अथवा सामान्यांच्या मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याचा मार्ग असमर्थनीय ठरतो. जॉर्जच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये अशीच अमेरिकेतील सामान्य नागरिकांची इच्छा आहे. एकीकडे राजकीय पक्ष या घटनेचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत तर दुसरीकडे अमेरिकेतील लहान गावांत अनेक नागरिक वर्णभेदाच्या विरोधात एकत्रित उभी असल्याचे आशादायी चित्र उभे राहिले आहे. झालेला प्रसंग, त्याला लागलेले हिंसक वळण, त्यातून निर्माण होणारा तणाव आणि त्याच्या परिणामांची जाणीव लहान गावातील नागरिकांना आहे.

जॉर्जच्या मानेला पोलिसांनी टोंगळ्याने दाबून ठेवले होते, तेव्हा जॉर्ज ‘मी श्वासोच्छवास घेऊ शकत नाही’ म्हणून विनवणी करत होता. जॉर्जला न्याय मिळावा म्हणून अनेकांनी I Cannot Breathe लिहिलेल्या पाटय़ा हातात घेवून शांततेने आंदोलन केले. जॉर्जच्या मारहाणीच्या वेळी हजर असलेल्या पोलिसांनादेखील सहआरोपी करण्यात आले आहे. येणाऱया काळात कायदा आपले कर्तव्य पार पाडेल. मात्र मधल्या काळात या वांशिक वणव्याने जे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले, राजकीय पाठबळाने जो हिंसाचार झाला त्याचे काय? या पद्धतीने सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचा गळा गोठण्याचा अधिकार कोणालाही नाही. जॉर्जच्या हल्लेखोरांना जेव्हा शिक्षा होईल आणि सामान्य अमेरिकन नागरिकांनाही जेव्हा मोकळा श्वास घेता येईल तीच जॉर्जला खऱया अर्थाने श्रद्धांजली ठरेल. तोवर अमेरिकेचा श्वास वांशिक वणव्यात कोंडलेलाच राहील.

आपली प्रतिक्रिया द्या