
अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीने कौटुंबिक वादातून पत्नी आणि तिच्या तीन नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केली. 51 वर्षीय विजय कुमार असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेच्या वेळी घरात असलेली तीन मुले कपाटात लपून बसली होती. हिंदुस्थानी दूतावासाने पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात एका हिंदुस्थानी वंशाच्या पुरूषाने त्याच्या पत्नी आणि तीन नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली आहे. शुक्रवारी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास ब्रूक आयव्ही कोर्ट परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना घरात चार जणांचे मृतदेह आढळले. त्या सर्वांना गोळ्या लागल्या होत्या. विजय कुमारची पत्नी मीमू डोगरा (४३), गौरव कुमार (३३), निधी चंदर (३७) आणि हरीश चंदर (३८) अशी मृतांची ओळख पटली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनेच्या वेळी घरात असलेली तीन मुले कपाटात लपल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. यामध्ये विजय कुमार आणि मीमू डोग्राचा १२ वर्षांचा मुलगा होता, ज्याने धैर्याने ९११ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. या कॉलमुळे काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी पोहोचू शकले. मुले सुखरुप असून त्यांना कुटुंबातील सदस्याकडे सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार आणि त्याच्या पत्नीचा त्यांच्या अटलांटाच्या घरी पूर्वी वाद झाला होता. त्यानंतर तो त्याच्या मुलासह ब्रूक आयव्ही कोर्टवरील एका घरात गेला, जिथे इतर नातेवाईक राहत होते. येथूनच वादाचे रूपांतर हिंसक गोळीबारात झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, परंतु त्याचे वाहन रस्त्यावर उभी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी के-९ युनिटच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला आणि जवळच्या जंगली भागात विजय कुमारला अटक केली.


























































