अमेरिकेला सेंट मार्टिन बेट वापरण्यासाठी दिले नाही म्हणूनच मला सत्तेतून हटवण्यात आल्याचा आरोप बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. तसेच बांगलादेशातील नागरिकांना वाचवण्यासाठीच पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राजीनामा देऊन हिंदुस्थानात पलायन केल्याच्या सहा दिवसांनंतर शेख हसीना यांनी याबद्दल भाष्य केले असून एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, लवकरच पुन्हा मायदेशी परतेन, असेही त्यांनी म्हटले आहे.
कट्टरपंथीयांनी सुरू केलेल्या हिंसाचारात मरण पावणाऱ्यांचा आकडा वाढू नये यासाठी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहावर चढून सत्ता काबीज करायची होती, पण मी पद सोडून त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचा दावा शेख हसीना यांनी केला आहे. मी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट आणि बंगालची खाडी देऊन खुर्ची वाचवू शकले असते, असेही शेख हसीना यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना कधीच रझाकार संबोधले नाही
मी विद्यार्थ्यांना कधीच रझाकार संबोधले नाही. देशात अस्थिरता आणण्यासाठी माझे शब्द चुकीच्या पद्धतीने पेरून दाखवण्यात आले. बांगलादेशातील जनतेच्या साधेपणाचा फायदा उचलून माझ्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप शेख हसीना यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेला सेंट मर्टिन बेटावर लष्करी तळ उभारायचा होता, असा दावा जून 2021 मध्ये बांगलादेशातील वर्तमानपत्रात करण्यात आला होता.