पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या गोष्टींचा एक्सरे रिपोर्टमुळे लागला शोध

एक्सरे केल्यावर वेगवेगळ्या गोष्टी अडकल्याच्या बातम्या अनेकदा वाचल्या असतील. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीच्या छातीत अचानक दुखू लागले आणि डॉक्टरांनी एक्सरे केल्यावर पाच वर्षांपूर्वी हरवलेली गोष्ट त्या व्यक्तीच्या फुफ्फुसात सापडली.

अमेरीकेतील ओहियो येथील घटना आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, सिनसिनाटी येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव  जोई लिंकीस आहे. त्याला दागिने आणि फॅशनच्या रिंग्स, इअरिंग्स घालण्याची आवड होती. एवढेच नाही तर त्याला नाकात रिंग घालण्याचीही आवड होती. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांनी नाकात घातलेली एक रिंग अचानक कुठेतरी हरवली होती. बरीच शोधूनही ती रिंग सापडली नाही.

जोई लिंकीस यांनी विचार केला कदाचित ती हरवली असेल. त्यानंतर त्यांनी दुसरी रिंग घातली. त्यानंतर पाच वर्षे लोटली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. पण दुखणं थांबत नसल्याने ते डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी एक्सरे काढण्याचा सल्ला दिला.

एक्सेर काढल्यानंतर जे समोर आले ते भयंकर होते. जोई लिंकीसच्या एक्सरे रिपोर्टमध्ये काहीतरी असल्याचे दिसून आले. जेव्हा तो एक्सेरे डॉक्टरांनी लिंकीस याला दाखवला त्यावेळी त्याने ती रिंग ओळखली. ही रिंग पाच वर्षांपूर्वी हरवली होती. ती पाहून तो हैराण झाला. सुदैवाने शस्त्रक्रिया करुन ती रिंग काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

सध्या तो रुग्णालयात आहे. स्थानिय मिडीया वृत्तानुसार, पाच वर्षांपूर्वी त्यांनी नाकात घातलेली रिंग सकाळी उठल्यावर गायब होती. त्यांनी ती बरीच शोधण्याचा प्रयत्न केला होता मात्र ती त्यांना मिळाली नाही. आता ती रिंग त्यांच्या फुफ्फुसातून बाहेर काढण्यात आली आहे.