
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क आता नव्या वादात सापडले आहेत. अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (SEC) मस्क यांच्यावर 2022 मध्ये ट्विटरमधील मोठा हिस्सा खरेदी करण्याबाबत माहिती देण्यास विलंब केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी एसईसीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
एलॉन मस्कने 2022 मध्ये ट्विटरचे 5 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले होते. मात्र त्यांनी 11 दिवसांनी यांची माहिती जाहीर केली. एसईसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कंपनीचे 5 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले तर त्याला 10 दिवसांच्या आत यांची माहिती द्यावी लागेल. मस्क यांनी या नियमाचे उल्लंघन केले आणि 4 एप्रिल 2022 रोजी त्यांनी ही माहिती जाहीर केली. तोपर्यंत त्याच्याकडे ट्विटरचे 9.2 टक्के शेअर्स होते.
एसईसीने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनीट्विटरचे शेअर्स कमी किमतीत खरेदी केले आणि जेव्हा ही गुंतवणूक नंतर उघड झाली, तेव्हा ट्विटरच्या शेअरची किंमत 27 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली. मस्क यांनी इतर गुतवणूकदारांना अंधारात ठेवून हे शेअर्स विकत घेतले. नंतर यांची किंमत वाढल्यानंतर सर्वाधिक फायदा हा त्यांनाच मिळाला, असा आरोप एसईसीने केला आहे. दरम्यान, 2022 मस्क यांनी ट्विटर 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले. नंतर त्यांनी याचं नाव बदलून X असं ठेवलं.



























































