अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने गुरुवारी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. इंटेल कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. या कंपनीमध्ये सध्या 1 लाख 24 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून जवळपास 18 हजार कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱयांवर बेकारीची कुऱहाड कोसळणार आहे. यंदाच्या वर्षी इंटेलच्या खर्चात 20 अब्ज डॉलरची कपात करण्याची योजना आहे. नुकतेच कंपनीला 1.6 अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. त्यामुळे कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱयांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कंपनीचा शेअर 1 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचे सीईओ पॅट गेलसिंगर यांनी नोकर कपातीसंबंधी माहिती दिली. आमची दुसऱया तिमाहीत खराब कामगिरी झाली. दुसऱया सहामाही निकालानंतर आम्हाला बऱयाच नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले, असे गेलसिंगर यांनी म्हटले. इंटेलचे शेअर्स या वर्षी 40 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.