अमेरिकन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाकाची माघार

नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्ड स्लॅमधील महिला एकेरीत चॅम्पियन होण्याचा मान संपादन करणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाका हिने दुखापतीमुळे 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱया फ्रेंच ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेमधून माघार घेतली आहे.

नाओमी ओसाका हिने सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना म्हटले की, अमेरिकन ओपन स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमधून अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे क्ले कोर्टवरील स्पर्धेसाठी तयारी करायला पुरेसा वेळ मिळणार नाही. अमेरिकन ओपन व फ्रेंच ओपन या दोन स्पर्धांमध्ये कमी कालावधी होता. त्यामुळे मला या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली आहे. स्पर्धा आयोजक व खेळाडूंना शुभेच्छा!

कोरोनामुळे फक्त पाच हजार प्रेक्षकांनाच एण्ट्री

फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या वर्षी 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया फ्रेंच ओपन स्पर्धेत एका दिवसाला फक्त पाच हजार टेनिसप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. याआधी दिवसाला 11,500 टेनिसप्रेमींना प्रवेश देण्याचा विचार स्पर्धा आयोजक करीत होते, पण अखेर गुरुवारी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला.

महिला विभागात चुरस

ऍश बार्टी व नाओमी ओसाका फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होणार नसल्या तरी महिला विभागात कमालीची चुरस दिसून येत आहे. सिमोना हालेप, कॅरोलिना फ्लिस्कोवा, सोफिया केनिन, बियांका आंद्रेस्क्यू, किकी बर्टेन्स या खेळाडूंचा सहभाग निश्चित आहे. सेरेना विल्यम्सला अमेरिकन ओपन स्पर्धेत मार्गरेट कोर्टच्या 24 ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाची बरोबरी करता आली नाही. फ्रेंच ओपन स्पर्धेत तिचे हे मिशन सुरूच राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या