कोरोनाबाबतचा अंदाज चुकल्यानेच हिंदुस्थानात वाईट परिस्थिती; अमेरिकेच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागाराचे मत

कोरोनाच्या दुसऱया लाटेत हिंदुस्थानात अक्षरशः कहर माजला आहे. ऑक्सिजनअभावी, औषधांच्या तुटवडय़ामुळे रोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. हिंदुस्थानात एवढी भयंकर स्थिती का झाली? यावर जगभरात खलबते सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट एवढी गंभीर असेल याबाबत हिंदुस्थानचे आकलन चुकले, अंदाजही चुकला. तसेच पहिली लाट ओसरण्याच्या आत घाईत सर्व व्यवहार सुरू केले. यामुळे ही परिस्थिती ओढावली, असे स्पष्ट मत अमेरिकेचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी मांडले आहे.

कोरोनामुळे एवढी विदारक स्थिती आहे की, गंगेच्या पाण्यात मृतदेह तरंगताहेत. या स्थितीची दखल आंतरराष्ट्रीय मिडियाकडून  घेतली जात आहे. तसेच, अनेक देशांनीही चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतही याबाबत चर्चा झडत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी सिनेट सदस्यांच्या आरोग्य कमिटीसमोर हिंदुस्थानच्या वाढत्या कोरोना कहराबाबत भूमिका मांडली. डॉ. फौची हे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अलर्जी अॅण्ड इन्फेक्शन डिसिजचे संचालकही आहेत.

कोरोनाची दुसरी लाट एवढी भीषण असेल असा अंदाज हिंदुस्थानला आला नाही. हिंदुस्थानला वाटले कोरोना आता संपला. त्यामुळे खूप लवकर सर्व व्यवहार सुरू केले आणि संसर्ग पसरला. हिंदुस्थानचा अंदाज चुकला, असे स्पष्टपणे सांगतानाच डॉ. फौची यांनी हिंदुस्थानच्या परिस्थितीमुळे जगाला धडा मिळाला. काय करू नये हे जगाला समजले, असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या