
पश्चिम आशियातील (Middle East) वाढता तणाव आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची राजनैतिक घडामोड घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक शांतता आणि जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सुरक्षा मुद्द्यांवर भर दिला.
हिंदुस्थानातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या संभाषणाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या चर्चेत होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित आणि सर्व देशांच्या वाहतुकीसाठी खुली ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले, असे ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संभाषणाबाबत X माहिती देताना सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोन आला होता आणि आमची पश्चिम आशियातील परिस्थितीवर उपयुक्त चर्चा झाली. हिंदुस्थान या क्षेत्रात लवकरात लवकर तणाव कमी करण्याच्या आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या बाजूने आहे.”



























































