कश्मीरचा खरा इतिहास लिहिण्याची वेळ आलीय, अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

239

कश्मीर हा 1947 साली देश स्वतंत्र्य झाल्यापासून वादाचा, चर्चेचा विषय राहिला आहे, मात्र काँग्रेस सरकारने कश्मीरचा इतिहास मोडतोड करून जनतेपुढे मांडला आहे. चुका करणाऱ्यांच्याच हाती इतिहास लिहिण्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी नेमके सत्य झाकून ठेवले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी नवी दिल्लीत केला. आता कश्मीरचा खरा इतिहास लिहिण्याची वेळ आलीय, असेही ते म्हणाले.

कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन करत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 630 राजवटी एकत्र आणल्या. त्यांच्या दृढतेमुळे त्या आज एका देशाच्या रूपात जगासमोर आपले अस्तित्व टिकवून आहेत. नेहरूंना जमले नाही त्यामुळे जम्मू-कश्मीरला एक करण्यास ऑगस्ट 2019 ची वाट पाहावी लागली. शेख अब्दुल्ला यांना तत्कालीन काँग्रेस सरकारने 11 वर्षे डांबून ठेवले, मात्र लोक दोन महिन्यांतच आम्हाला प्रश्न करू लागले आहेत अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस व इतर विरोधकांना सुनावले. कश्मीरच्या मुद्दय़ावरून जळफळाट करणारा पाकिस्तान जगात एकाकी पडला आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कौशल्याचे मोठे यश आहे, असेही त्यांनी सांगितले.

नेहरूनी हिमालयापेक्षाही मोठी चूक केली!
कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेण्याचा जवाहरलाल नेहरूंचा वैयक्तिक निर्णय होता. त्यांची ही चूक हिमालयापेक्षाही मोठी आहे अशा शब्दांत शहा यांनी कश्मीरचा मुद्दा रेंगाळण्याचे खापर नेहरूंवर फोडले. कलम 370 बाबत अजूनही अफवा पसरवल्या जात आहेत. लोकांचा संभ्रम दूर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या