भाजप ‘370’ घराघरात पोहोचवणार, विरोध करणार्‍यांना त्यांची जागा दाखवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या झालेल्या ऐतिहासिक निर्णयाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. हाच मुद्दा घेऊन भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत व्याख्यान घेतले. निवडणूक जाहीर होण्याच्या दुसर्‍याच दिवशी झालेल्या सभेत ‘कश्मीरातील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करणार्‍यांना त्यांची जागा दाखवा’ असे आवाहन करीत त्यांनी निवडणूक प्रचाराचेही रणशिंग फुंकले.

कश्मीरमधील 370 कलम रद्द झाल्याबाबत भाजपकडून देशभरात व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. भाजपची ‘राष्ट्रीय एकता अभियान’ नावाने संपर्क मोहीम राबविण्यात येणार असून याअंतर्गत राष्ट्रीय अमित शहा व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षातील केंद्रीय नेते प्रत्येक मतदारसंघातील किमान दहा प्रतिष्ठतांची भेट घेऊन जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटविण्यामागील भूमिका विषद करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन  आज गोरेगाव येथील नेस्को संकुलात करण्यात आले होते. यावेळी  बोलताना अमित शहा यांनी कश्मीरमधील एकूणच स्थितीचा आढावा घेतला आणि त्यावरून विरोधकांवर शरसंधानही केले.

राष्ट्रवादी पक्षासोबत जायचे की घराणेशाहीसोबत?

यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 370 कलम  रद्द करणे हा राजकीय मुद्दा असल्याचे राहुल गांधी म्हणत आहेत, पण ते राजकारणात आता आले. भाजपच्या तीन पिढय़ांनी यासाठी बलिदान केले आहे. हिंदुस्थानला सर्वस्व मानणार्‍या राष्ट्रवादी भाजपसोबत जायचे की घराणेशाही करणार्‍या पक्षांसोबत जायचे हे जनतेनेच ठरवायचे असे आवाहन शहा यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री आशीष शेलार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, खासदार भूपेन्द्र यादव आदी उपस्थित होते.

पवार यांनी कान देऊन ऐकावे

शरद पवार हेही कश्मीरात अशांतता पसरल्याचे म्हणत आहेत, पण कान उघडून ऐका. 370 कलम रद्द झाल्यापासून कश्मीरात एक गोळीही झाडली गेली नाही. या छत्रपतींच्या भूमीत 370 कलम रद्द करण्याला विरोध करीत आहेत. 370 कलमाला विरोध आहे की पाठिंबा हे आधी जाहीर करा, असे अमित शहा म्हणाले.