पावसाने रोखल्या अमित शहा यांच्या सभा

नंदुरबारमधील नवापूर येथील सभा आटोपून अमित शहा सकाळी शिर्डीत आले. त्यानंतर ते अकोले आणि कर्जत-जामखेडला सभा घेणार होते, पण पावसामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करावे लागले.

शनिवार सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा, प्रचारयात्रा झाल्या असल्या तरी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना मात्र या पावसाचा फटका बसला. नगरमधील अकोले या ठिकाणी निघालेल्या अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे खराब वातावरणामुळे इमर्जन्सी लॅण्डिंग करावे लागले.

अमित शहा यांची अकोले आणि कर्जत-जामखेडमध्ये सभा होणार होती. ते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या विरोधात कर्जतमध्ये सभा घेणार होते. अकोल्याला जाण्यासाठी ते हेलिकॉप्टर घेऊन उडाले खरे पण दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी ओझर विमानतळावर त्यांना उतरावे लागले. ढगाळ आणि खराब वातावरणामुळे पायलटने हा निर्णय घेतला. चाळीस मिनिटांच्या विश्रांतीनंतर तीन वाजता त्यांचे हेलिकॉप्टर नगरच्या दिशेने रवाना झाले.

आपली प्रतिक्रिया द्या