‘बिग बी’ यांनी जाहीर केला अवयव दानाचा संकल्प; चाहत्यांनी केले कौतुक

एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बॉलीवूडकडून संकटग्रस्तांना मदत करण्यात येते. त्यात महानायक बिग बी अमिताभ बच्चन आघाडीवर असतात. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत आपला अवयवदानाचा संकल्प जाहीर केला आहे. त्यांनी ट्विटरवर आपल्या या संकल्पाची माहिती दिल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या काही चाहत्यांनी आपणही अवयवदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर काहींनी करणार असलेल्या अवयवदानाचे सर्टिफिकेटही शेअर केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोत त्यांच्या कोटवर एक छोटी हिरवी रिबीन आहे. हा फोटो शेअर करत आपण अवयवदानाची प्रतिज्ञा केल्याचे अमिताभ बच्चन यांनी जाहीर केले आहे. कोटवर ही हिरवी रिबीन या प्रतिज्ञेच्या पवित्रतेचे प्रतीक म्हणून लावली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटनंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या या संकल्पाचे कौतुक केले आहे. काहीजणांनी आपणही अवयवदान करणार असल्याचे म्हटले आहे. काहीजणांनी करणार असलेल्या अवयवदानाचे सर्टिफिकेट शेअर केले आहे. तर काही चाहत्यांनी बिग बी यांच्याकडून प्रेरणा घेत अवयवदानाचा संकल्प केल्याचे म्हटले आहे. सर, आपल्याला हेपेयायटिस बी झाला होता. तसेच तुमची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आपण अवयवदान करू शकत नसल्याचे एका चाहत्याने म्हटले आहे. मात्र, तुमचा निर्णय इतरांना प्रेरणा देणार आहे, असेही त्या चाहत्याने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या