भोंदू बाबा अशोक खरातचे VSR कनेक्शन उघड झाले…, अमोल मिटकरींच्या सोशल मीडियातील पोस्टने नवा ट्विस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला राजकीय ज्योतिषी अशोककुमार खरात याचे VSR या विमान कंपनीशी देखील कनेक्शन असल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत अशोक खरात यांचा अजित पवार यांच्या विमान अपघाताशी देखील संबंध असल्याची शक्यता वर्तवली आहे.

पालिका निवडणूकीआधी अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील घरापासून काही अंतरावर अघोरी पूजा करण्यात आली होती. त्याचा संदर्भ देत मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. “या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ ! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या? शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी या पूजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते. अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरातचे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की २७ जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतय”, असे मिटकरी यांनी ट्विट केले आहे.