Maharashtra Assembly Election 2024 – अमरावती जिल्ह्यात महायुतीत बंडखोरी

अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज कोण मागे घेईल आणि कोणते उमेदवार रिंगणात असतील हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु सध्या तरी अमरावती, बडनेरा, दर्यापूर, तिवसा आणि मेळघाट या पाच मतदारसंघांत महायुतीत बंडखोरी झाली आहे. मोर्शी मतदारसंघात महायुतीतील भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. यासोबत अचलपूर मतदारसंघातही भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली असून त्यांची मनधरणी सुरू आहे. 2019 च्या निवडणुकीत तिवसा, अमरावती, दर्यापूर या तीन मतदारसंघांत काँग्रेसने विजय मिळवला होता, तर अचलपूर आणि मेळघाटमध्ये प्रहारने बाजी मारली होती. धामणगाव रेल्वेत भाजप, बडनेरात युवा स्वाभिमानी, मोर्शीत शेतकरी स्वाभिमान पक्षाने विजय मिळवला होता.

14 आमदार रिंगणात

जिल्ह्यात आठ मतदारसंघांत एकूण 14 आमदार रिंगणात उतरले आहेत. अमरावती व मेळघाटमधून प्रत्येकी तीन, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर येथून प्रत्येकी दोन, तर तिवसा, बडनेरा, मोर्शी व अचलपूर मतदारसंघांतून विद्यमान आमदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.