
अमरावती शहरातील निसर्ग संपन्नतेने नटलेल्या वडाळी तलाव आणि परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्यासाठी या ठिकाणी लवकरच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य पर्यटन उद्यान साकारले जाणार आहे. उल्लेखनिय म्हणजे शिवसेनाप्रमुखांची आजोळ अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे आहे. त्यामुळे या उद्यानाचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात एक ठराव पारीत करण्यात आला. दिनेश बूब यांच्या नेतृत्वात एक समिती गठित करण्यात आली असून या समितीत महापौर चेतन गावंडे, सभागृह नेते तुषार भारतीय, माजी महापौर विलास इंगोले, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांचा समावेश आहे.
वडाळी भागात राज्य राखीव पोलीस दल, वनविभाग आणि महापालिकेच्या जमिनींवर नैसर्गिक संसाधनांनी परीपूर्ण असलेले दोन तलाव, आणि निसर्गसुंदर भूभाग आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ उभारले जावे, असा विचार दिनेश बूब यांनी मांडला. सर्वसाधारण सभेत त्यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यानाच्या निर्मितीसाठी समिती गठित करण्याचा ठराव मांडला, तो सर्वानुमते पारित करण्यात आला. ही समिती राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून या उद्यानाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल, विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार या समितीला बहाल करण्यात आले आहेत.
या उद्यानात अॅम्फी थिएटर, प्रदर्शनांसाठी जागा, खुले सभागृह, कला दालन, महाराष्ट्राचा इतिहास आणि अमरावती शहराच्या स्थित्यंतराचे सादरीकरण, मेडिटेशन सेंटर, पारंपारिक वस्तूंचे संग्रहालय, जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती, थोर व्यक्तींचे जीवनचरित्र तसेच महत्वाच्या घडामोडींचे सादरीकरण या ठिकाणी केले जाणार आहे.
उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था, थ्रीडी आणि फाईव्ह डी शो, अम्यूझमेंट पार्क, रेन डान्स, झू/ स्नेक पार्क, स्नो पार्क, सायकलिंग ट्रॅक, सर्कस, लेझर शो, कारंजी, बोटिंग आणि झिप लाईन, इनडोअर क्लब गेम्स, ओपन जिम, स्केअरी हाऊस, पेंट बॉल, गो कार्टिंग या सुविधा राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीस्थळ, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, लेक साईड जेट्टी हे विशेष आकर्षण राहणार आहे.