बदलापूरमध्ये चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातही या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतील शौचालयातच अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
पुण्यातील भवानी पेठेतील एका नामांकित शाळेत 15 ऑगस्ट रोजी हा घृणास्पद प्रकार घडला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी पीडित मुलगी शाळेत आली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर आपली बॅग आणण्यासाठी चालली होती. यावेळी मुलांच्या शौचालयाजवळ उभ्या असलेल्या 19 वर्षीय तरुणाने तिचा हात धरुन बळजबरीने तिला शौचालयात ओढत नेले. यानंतर त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलीने आपली सुटका करुन घेत तिथून पळ काढला.
घरी जाऊन मुलीने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आरोपी देवराज पदम आगरी याला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 74, 75 (1) (i) आणि POCSO कायद्याच्या कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक माने करीत आहेत.