अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार; 800 बळी, घरांच्या ढिगाऱ्याखाली हजारो अडकले; अडीच हजार जखमी

अफगाणिस्तानात पुन्हा भूकंपामुळे अक्षरशः हाहाकार माजला. पूर्वेकडील भागात रविवारी रात्री उशिरा 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. यात किमान 800 लोकांचा मृत्यू झाला तर अडीच हजार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मोठ्या प्रमाणावर घरे भुईसपाट झाली असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली हजारो लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांची धडपड सुरू आहे.

अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक प्रमाण वेळेनुसार रात्री 11 वाजून 47 मिनिटाने भूकंप झाला. नांगरहार प्रांतातील जालालाबादपासून सुमारे 27 किलोमीटर ईशान्येला भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले. केवळ 8 किलोमीटर खोलीवर भूकंप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे उघड झाले.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतालाही फटका

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वाच्या सीमेला लागून असलेल्या भागात मध्यरात्रीच्या सुमारास 10 किमी खोलीवर भूकंप झाला. या घटनेत अनेक घरे जमीनदोस्त झाली. दुर्गम भाग असलेल्या या प्रांतातील अनेक जिह्यांमध्ये बचाव पथके काम करत होती, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात नेहमीच भूकंप होत असतात. हिंदुकूश पर्वतरांगांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. गेल्या वर्षी या भागात पश्चिमेकडे झालेल्या भूकंपामध्ये 1 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

अफगाणिस्तानातील भूकंपात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. तर जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हिंदुस्थानच्या वतीने अफगाणिस्तानातील पीडितांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल, अशा शब्दांत पंतप्रधानांनी एक्सवरून भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, हिंदुस्थानातून मोठ्या प्रमाणावर मदत तत्काळ अफगाणिस्तानात पाठवण्यात आली.