नगर रोडवरील कामगार चौकात वाहने अडविणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका कार चालकाने उडविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
कामगार चौकातील वाहतूक सिग्नलवर वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार देविदास दहिफळे हे सकाळी साडेअकरा वाजता कार्यरत होते. त्यावेळी नगरकडून पंढरपूरकडे येणारी कार (एमएच 21 एसई 9689) येत होती.
सिग्नल लागल्याने या कारला थांबण्याचा इशारा करण्यासाठी दहिफळे पुढे सरसावले होते. कारचालकाने मात्र, न थांबता सरळ पुढे झालेल्या दहिफळे यांना उडविले. कारने दिलेल्या धडकेत दहिफळे खाली पडून त्यांच्या पाय व हाताला गंभीर दुखापत झाली. या सिग्नलवर उपस्थित असलेले पोलीस अंमलदार गोपाल पुरभे यांनी नागरिकांच्या मदतीने कारचालकाला पकडले. याप्रकरणी देविदास दहिफळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक विकास दयाराम राठोड (31, रा, लाईन नं.13, एसआर नं.60/1 कसद कॉलनी साईपार्क कोंडवा, पुणे) याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.