अनंत गर्जेचा जामिनासाठी अर्ज, सत्र न्यायालयाची पोलिसांना नोटीस

बहुचर्चित डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी अनंत गर्जेने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याची दखल घेत सत्र न्यायालयाने पोलिसांना याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा स्विय सचिव अनंतने अॅड. मंगेश देशमुख यांच्यामार्फत हा अर्ज केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रूपाली पवार यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांना नोटीस जारी करत ही सुनावणी 19 जानेवारीपर्यंत तहपूब केली.

मी निर्दोष 

मी माझ्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केलेले नाही. पत्नीने आत्महत्या करावी असे कोणतेही मेसेज मी तिला केलेले नाही. मी तपासात सहकार्य केले आहे. यापुढे मला कोठडीत ठेवून काहीच साध्य होणार नाही. तेव्हा मला जामीन मंजूर करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डॉ. गौरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती अनंत गर्जेमुळे डॉ. गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पुटुंबीयांनी केला. घटनेच्या दोन दिवसांनंतर 24 नोव्हेंबरला अनंत गर्जे पोलिसांना शरण आला.