रायगडातून अनंत गिते प्रचंड बहुमताने निवडून येतील – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

रायगडातील लोकसभेची निवडणूक ही सदाचार विरूद्ध भ्रष्टाचाराची आहे. एकीकडे निष्कलंक, प्रामाणिक, सुसंस्कृत व जनतेसाठी काम करणारे अनंत गिते आहेत तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सुनिल तटकरे आहेत. त्यामुळे रायगड मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार अनंत गिते प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथे अनंत गिते यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत केला.

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. प्रवीण दरेकर, माजी मंत्री रविशेठ पाटील, जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, संतोष पाटील, वैकुंठ पाटील, भाजपचे सरचिटणीस विष्णू पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, चिटणीस बंडू खंडागळे, गंगाधर पाटील, मिलिंद पाटील, ओंकार दानवे, रामशेठ ठाकूर, नरेश सोनावणे देवेंद्र साटम, जगदीश गायकवाड, महेश बालदी, अच्युत पाटील, चेतन मोकल, आशिष वर्तक, विशाल दोषी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लवकरच पेण अर्बन बँकेची जमीन सिडको मार्फत खरेदी करण्यात येणार आहे व ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एमएमआरडीए च्या माध्यमातून रायगडात 10 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ज्यायोगे या जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास होईल. पैसा पैशातून सत्ता व सत्तेतुन पैसा हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची निवडणूकीतुन माघार हीच राष्ट्रवादीच्या पराजयाची सुरूवात आहे. राष्ट्रवादी कडे बोलणारे नेतेही नसल्याने त्यांना भाड्याने रेल्वे ईजिन आणावे लागत आहे. परंतु ही रेल्वे बंद पडलेली आहे ती चालणार नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

अनंत गिते म्हणाले की, 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी शेकापने श्वेत पत्रिका काढली होती पण आज तेच गळ्यात गळे घालत आहेत ही भ्रष्टाचाराची आघाडी आहे. या सर्व भ्रष्टाचाऱ्याचा माझ्या हस्ते अरबी समुद्रात विसर्जन होणार आहे. ही लोकसभेची लढाई नसुन भ्रष्टाचारा विरोधात सदाचाराची लढाई आहे.